मुंबई | गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (national mourning) जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आज संध्याकाळी शिवाजी पार्क (shivaji park) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी सशस्त्र जवान त्यांना सलामी देतील.
गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांची मृत्यूशी झूंज सुरू होती. या काळात त्यांनी न्यूमोनियावर मातही केली होती. त्यांना कोरोना झाला होता. त्यावरही उपचार सुरू होते. पण त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आता ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी काही काळ ठेवलं जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, मातृतुल्य आशीर्वाद हरपला- उद्धव ठाकरे
…म्हणून लता मंगेशकर यांनी लग्न केलं नाही, ‘हे’ होतं कारण
लता दीदी आम्हाला सोडून गेल्या, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे- नरेंद्र मोदी