सातारा | आपल्या हटके आणि बिंधास्त शैलीसाठी खासदार उदयनराजे भोसले सर्वत्र परिचीत आहेत. तसेच उदयनराजे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी राज्यभर चर्चेत असतात. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना उदयनराजे भोसले यांनी खुलं आव्हान दिलं आहे.
मी कुठल्या पक्षाच्या विरोधात नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर म्हणतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे. मी ईडीची चौकशी करायला तयार आहे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लोकलुटारे हे ठरवा अगोदर. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार रहा, असं आव्हान उदयनराजे यांनी अजित पवारांचं नाव न दिलं आहे.
माझ्याबाबत कोण काय बोललं याची मला माहिती नाही. परंतु, माझ्यावर खोट्या केसेस दाखल करून मला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. सत्ता आहे तोपर्यंतचं त्यानंतर काय?, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावं, ज्यावेळेस तुमचा कार्यकाळ संपतो तेव्हा कर्मचारी सुद्धा तुमच्याकडे पाहत नाही. परंतु, आपलं तसं नाहीये स्टाईल इज स्टाईल, असं म्हणतानाच उदयनराजेंनी कॉलर उडवली.
काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि सातारा तालुक्यामध्ये खंडणीखोरांचं प्रमाण वाढलं आहे, असं म्हटलं होतं.
लोकप्रतिनिधी चांगले असतील तर कामे चांगली होतात. पण लोकप्रतिनिधीच जर ठेकेदाराला पाठीशी घालत असतील तर काम नीट होत नाहीत. सातारा एमआयडीसीचे उदाहरण समोर आहे, असं अजित पवार म्हणाले होते.
तसेच सातारा एमआयडीसीमध्ये सर्व बाबी पोषक असतानाही उद्योजक एमआयडीसीमध्ये येत नाहीत. साताऱ्यात उद्योग का येत नाहीत?, असा प्रश्न अजित पवारांनी केला होता.
दरम्यान, तुम्ही त्यावेळेस साताऱ्याचे लोकप्रतिनिधी होता. मंत्री असताना तुम्ही जबाबदारी का पार पाडली नाही?,असा सवाल उदयनराजेंनी केला. ज्या कंपन्या सातऱ्यातून गेल्या त्यांना विचारा. कंपन्या साताऱ्यातून जाण्यास कोण कारणीभूत आहे?, असं असताना देखील खंडणी मागतो, असा आरोप माझ्यावर केला जात आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार राहा, असं आव्हान उद्यनराजेंनी दिलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“जे बोलतो ते CR करतोच, येणाऱ्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर…”
“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”
दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण
“राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी काही डावपेच रचलेत, माझा अर्ज 100 टक्के जाणार”