निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं, महाराष्ट्रावर विठू-माऊली आणि मुंबादेवीची कृपा- मुख्यमंत्री

मुंबई |  ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या, मदत व बचाव कार्य करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला .संकट म्हटले तर मोठे होते, पण हे संकट आपण सगळ्यांनी परतावून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने अपघातात दोन जीव गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.”

“मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे, तसे पंढरपूरच्या विठू माऊलींचे आशीर्वादही आहेत. मुख्य म्हणजे या वादळाचा सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या.”

“निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही. पण संकटकाळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे या वादळात दिसुन आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.”