मुंबई : शिवसेनेला मत म्हणजे मोदी शहांना मत त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करु नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच आपल्या जाहीर सभेतून केलं होतं. या मुद्द्यावरुन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आमनेसामने आल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये पार पडलेल्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.
जे तुम्हाला सांगत आहेत ना… की तुम्ही याला मत देऊ नका त्यांना देऊ नका, त्यांना विचारा… अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ?, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की युतीला संपवण्यासाठी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकले होते तो ओवैसी तुम्हाला चालणार आहेत का?, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.
ओवैसीचा पक्ष हा निजामाला पाठिंबा देण्यासाठी उदयास आला. एक औरंगजेब आम्हालासुद्धा जवळचा वाटतो. पण तो औरंगजेब नावाचा एक सैनिक होता. तो मुसलमान होता पण देशासाठी लढत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. जो या देशाला आपला देश मानतो तो धर्माने कोणताही असो तो आमचा आहे, असंही ते म्हणाले.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही हल्ला चढवला.
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे???
“जवान सीमेवर लढतायंत. सत्तेवर जर नेभळट सरकार आले तर परिस्थिती बिघडेल. नेतृत्व कचखाऊ असेल तर सैन्य काही करु शकत नाही. आदेश मिळाले नाही तर सैन्यदेखील काही करु शकत नाही”
शरद पवार यांनी राजीव गांधी यांना देखील दगा दिला होता. त्यावेळी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते, की मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन, पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. कुठं गेला हिमालय? कुठं गेलं ते काळं तोंड.?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत येत्या काळात मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आता आपल्या सभेतून उद्धव ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.