शरद पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का?- उद्धव ठाकरे

मुंबई : पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. मुंबईत आयोजित आचार्य अत्रे पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सभेत पुणेरी पगडी नाकारली होती. यापुढील कार्यक्रमात फुले पगडी वापरा अशी सक्त ताकीदही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“आजच्या घडीला आपण महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या पगडीचे राजकारण करतो आहोत. मात्र ते करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? आपण टिळक, महात्मा फुले यांचे कार्य विसरतो आहोत आणि त्यांच्या पगडीवरून राजकारण करण्यात धन्यता मानतो आहोत.

पत्रकार म्हटले की टिळक, आगरकर यांचा उल्लेख येणारच. लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांचे कार्य प्रचंड आहे. आपण ते सोयीस्करपणे विसरतो आणि त्यांच्या पगड्या घालून आपण महात्मा होण्याचा प्रयत्न करतो. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना विचारले होते सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हाच प्रश्न पगडी घालून मिरवणाऱ्यांना आणि त्याचे राजकारण करण्यांना विचारला पाहिजे की तुमचे डोके ठिकाणावर आहे का? ठिकाणावर सोडून द्या, डोके आहे का?.

हिंमत असेल तर टिळक, महात्मा फुले यांच्या कतृत्त्वाची उंची गाठून दाखवा. लोकमान्य टिळक म्हटले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण आजच्या घडीला हा विचार करायला हवा की लोकमान्य टिळकांना जे स्वराज्य अपेक्षित होते ते स्वराज्य आहे का? देशात दुसरी आणीबाणी आली अशी कुजबूज होताना दिसते आहे. एक काळ असा होता की मीडिया सरकारवर लक्ष ठेवायचा. आता काळ असा आहे की सरकार मीडियावर लक्ष ठेवताना दिसते आहे.”

-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख