अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर फेसबुकवर पेटला वाद… नेमका काय आहे प्रकार?

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असतानाच आता एक वाद पेटला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी टाकलेली पोस्ट या वादाला जबाबदार ठरली आहे. अभिनेता जितेंद्र जोशीनं या पोस्टची चिरफाड करणारी पोस्ट लिहिली आहे. दोन्ही पोस्टमुळे सोशल मीडियात वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टी या वादामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

नेमका काय आहे प्रकार?

विजय चव्हाण यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त झाला. अनेक मराठी अभिनेते अभिनेत्रींनी दुःख व्यक्त केलं. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांना मात्र यामध्ये काहीतरी खटकलं, त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. पोस्ट इंग्रजीत लिहिण्यात आली होती, मात्र तिरकस लिखाण करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर चांगलीच टीका केली होती. 

काय होतं सचिन कुंडलकर यांच्या पोस्टमध्ये?

“मराठी रंगभूमीवरील सर्व कलाकार तुमचे मामा आणि मावशी कसे असू शकतात??? प्रत्येक आठवड्यात मामा-मावशीच्या निधनाने रंगभूमी कशी पोरकी होते??? जेव्हा मामा आजारी होते तेव्हा त्यांना भेटायला कोणी गेलं होतं का? जेव्हा रंगभूमीवरील सध्याच्या मामा आणि मावशींचं निधन होईल तेव्हा उमेश कामत मामा असेल, स्पृहा आत्या असेल? तर सई तुमची मावशी असेल? आणि त्यानंतर अमेय वाघ मामा आणि पर्ण पेठे मावशी? रंगभूमी पोरकी झाली हे खूपच रटाळ वाक्य आहे”

कुणी केलं समर्थन तर कुणी दर्शवला विरोध-

सचिन कुंडलकर यांची पोस्ट फेसबुकवर पडताच यासंदर्भातील चर्चेला सुरुवात झाली. अनेकांनी सचिनच्या पोस्टशी सहमती तर दर्शवली काही जणांनी मात्र सचिनच्या पोस्टचा विरोध केला. व्यक्त होण्यासाठी ही वेळ योग्य नसल्याचं काही जणांचं म्हणणं होतं. 

जितेंद्र जोशीची फेसबुक पोस्ट-

अभिनेता जितेंद्र जोशी मात्र सचिन कुंडलकर यांच्या फेसबुक पोस्टवर व्यक्त झाला नाही. फेसबुकवर स्वतंत्र पोस्ट लिहित त्यानं सचिन कुंडलकर यांच्या फेसबुक पोस्टची चिरफाड केली. कुंडलकर यांचा जितेंद्र जोशीनं चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर यासंदर्भातील वादाला तोंड फुटलं असून लोक आता या पोस्टवर व्यक्त होत आहेत. अनेकांनी जितेंद्र जोशीला पाठिंबा दिला असून यामध्ये अनेक कलाकारांचा देखील समावेश आहे. 

काय आहे जितेंद्र जोशीची फेसबुक पोस्ट?

सचिन कुंडलकर, काय कमाल लिहिता हो तुम्ही… पण गंमत अशी की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात परंतु ती संधी तुम्ही आम्हाला देउच्च शकत नाही कारण विजय चव्हाण यांना आम्ही “मामा” म्हटलेलं तुम्हाला चालत नाही परंतु सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता “मावशी” म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेश”दा” असा करता . बरं कसंय ना कि हे आम्हाला लहानपणापासून शिकवलंय आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईला सुद्धा मावशी आणि रिक्शा टॅक्सी वाल्या वयस्कर गृहस्थाला अत्यंत सहजतेने काका/मामा म्हणतो आणि हे कुणीतरी बळजबरी केली म्हणून नव्हे तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप. तुम्ही अभ्यासू आणि होऊ घेतलेले विचारवंत आहात म्हणून आणखी खोलात जाऊन् याचा विचार केल्यास असे लक्षात येते की “बाप राखुमादेवीवरु” असं म्हणणाऱ्या ज्ञानोबारायांना आम्ही “माऊली” म्हणतो. साधी मुक्ताबाई परंतु आमच्या तोडून् “मुक्ताई” म्हणत त्या भावंडांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर अशी परंपरा आणि संस्कार लाभलेले आम्ही “भारतीय” तुमच्या त्या फ्रांस आणि इटली मधे जाऊन सुद्धा तिथल्या एखाद्या गोऱ्याला uncle /aunty असेच संबोधतो कारण ते आम्हाला आपसुक येतं आणि आम्हाला त्याची लाज वाटत नाह . बरं मग तुमच्यासारख्या माणसाच्या लिखाणाची पर्वा तरी का वाटावी परंतु तो सुद्धा संस्कारांचाच एक भाग आहे बरं का कारण तुकोबांनी सांगितलंय 

” मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास 
कठीण वज्रास भेदु ऐसे
भले तरी देऊ गांडीची लंगोटी
“नाठाळाच्या” काठी देऊ माथा”

तर आता आमचे विजू मामा. तुम्हाला सांगायची गरज नाही तरी सांगतो की ही व्यक्ति स्वतःच्या घरात मुठभर लोकांना जमवून आपल्या “पंखाख़ाली” घेऊन मी  कसा/किती दिग्गज म्हणत शिकवण्या घेत बसली नाही तर रंगभूमीवर प्रत्यक्ष काम करताना केदार, अंकुश, क्रांती अशा अनेक सहकार्यांच्या कळत नकळत त्यांना शिकवत राहिली त्यांच्यासोबत खेळत राहिली. त्यांनी कुठली शिबिरं घेतली नाहीत, कुठल्या पारितोषिक वितरण समारंभाला जाऊन् पहिल्या रांगेतली जागा अडवली नाही, येता जाता परिसंवादात भाषणे ठोकली नाहीत (अर्थात शिबिरं आणि परिसंवाद प्रामाणिकपणे भरवणारे आणि त्यातून सुदृढ कलाकार घडवणारेसुद्धा मोजकेच का होईना पण आहेत) परंतु काम करताना, उठता बसता सहकलाकारांची काळजी घेत , त्यांची थट्टा करत त्यांना काही गोष्टी शिकवल्या आणि आमच्या मनात जागा पटकावली. शिवाय एकीकडे “मोरुची मावशी” केलंच परंतु दुसरीकडे विजयाबाईंसोबत “हयवदन” सुद्धा केलं. (आम्हाला सर्वांना खरंतंर मोरुची मावशी च पुरतं परंतु हयवदन चा उल्लेख खास तुमच्यासाठी) ज्या गोष्टीमुळे आपली ओळख आहे तो “नाटक” नावाचा प्रकार माहितही नसलेल्या लोकांसमोर काम करुन् त्यांचं मनोरंजन केलं.

नाटक, त्यातलं काम, अभिनय या विषयावर उत्तमोत्तम भाषणे करणारे स्वतः काम करताना निष्प्रभ होतात आणि “विजुमामा” सारखे नट बोलत नाहीत तर करून दाखवतात. मी एकाच चित्रपटात काम केलं त्यांच्यासोबत परंतु तरीही ते माझे विजुमामा झाले कारण त्यांनी माझ्यासारख्या नवख्या मुलाची प्रचंड काळजी घेतली. बरं बाकी अशोक “मामा”, नीना “ताई” , वंदना “मावशी” , मोने “काका” यांच्याविषयी नंतर कधीतरी सांगीन तुम्हाला.

राहता राहिला प्रश्न अमेय, उमेश यांच्या काका आणि स्पृहा, सई, अमृता, पर्ण यांच्या मावश्या /आत्या होण्याचा तर माझी मुलगी आत्तापासूच त्यांना अशीच हाक मारते याचं कारण संस्कार!! शिवाय ज्या लोकांची व्यक्तिगत ओळख नसूनही विजय चव्हाण यांना “मामा” असं संबोधावसं वाटतंय त्यांना सुद्धा मी समजून घेऊ शकतो. कारण ऋषिकेश मुखर्जी, राज कपूर यांच्या निधनाची बातमी वाचून मी स्वतः हळहळलो होतो आणि हृषिदा, बासुदा असा आजही उल्लेख आपसुक होतो आणि प्रेम वाटत राहतं याचं कारण त्यांच्या कामासोबत मी आणि माझं मन जोडलं गेलंय. तसं नसतं तर मोहन जोशी नावाचा मोट्ठा नट ज्याला आम्ही मोहन “काका” म्हणतो, दर 31 जुलैला रफी साहेबांच्या पुण्यतिथिला सांताक्रुझच्या कब्रस्तान समोर (जिथे रफी साहेबांची कबर आहे) रात्रभर गाड़ी लावून रफी साहेबांची गाणी ऐकत बसला नसता. 

तुमची पोस्ट वाचून तुम्हाला कालच उत्तर देणार होतो परंतु तुम्हाला नसलेलं “सोयर सुतक” पाळुया, असं ठरवलं. शिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहेच. असा नट होणे नाही, रंगभूमी पौरकी झाली, असं मी म्हणणार नाही परंतु आम्हा मुलांच्या मनातल्या एका कोपऱ्यातली एक जागा रिकामी झाली हे नक्की. 

तुम्हाला आणखी लांबलचक उत्तर देण्याची इच्छा आहे परंतु ते विचार आणि भाषा प्रत्यक्ष भेटीसाठी राखून ठेवीन म्हणतो. काळजी घ्या … -जितेंद्र जोशी