चंद्रापासून 2.1 किमी दूर विक्रम लँडरशी संपर्क तुटला

बंगळुरु : चंद्रयानावरील विक्रम लँडरच्या सर्वात महत्त्वाच्या 15 मिनिटात सर्वांनी श्वास रोखून धरला. सर्व काही सुरळीत सुरु होतं, पण अचानक एक क्षण असा आला की इस्रोच्या नियंत्रण कक्षात सगळीकडे शांतता पसरली.

इस्रोचे प्रमुख के शिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही तरी माहिती दिली आणि ते पुन्हा खाली नियंत्रण कक्षात आले. काही वेळातच इस्रोने कंट्रोल रुममधून आपलं थेट प्रक्षेपणही बंद केलं. अखेर काही वेळातच विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याची घोषणा करण्यात आली.

चंद्रयान 2 मोहिम यशस्वी होण्यासाठी 20-20 तास काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला. इस्रोने अजूनही अपेक्षा सोडलेली नाही. कारण आकडेवारीचं विश्लेषण सध्या केलं जात असून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे.

चमत्कारीकरित्या विक्रम लँडरशी संपर्क झाल्यास भारताच्या नावावर नव्या इतिहासाची नोंद होईल. विशेष म्हणजे विक्रम लँडर चंद्रापासून केवळ 2.1 किमी दूर असतानााच हा संपर्क तुटला.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम केले. पण चंद्रावर पाय टेकण्यापूर्वीच विक्रम लँडरशी संपर्क तुटला आणि यामुळे सर्व शास्त्रज्ञांसाठीही हा मोठा धक्का होता.