दुष्काळ, नापिकीला कंटाळून गावच काढलं विकायला; मायबाप सरकारनं लक्ष देण्याची गरज

हिंगोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै महिना संपत आला तरीही पावसानं तोंड दाखवलं नाही. पाण्याअभावी पेरणी केलेली पीकं करपण्याच्या मार्गावर आहेत. शेती कोरडवाहू असल्यानं सततचा दुष्काळ जणू हिंगोलीच्या पाचवीलाच पुजलाय.

सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या ताकतोडा गावातील गावकऱ्यांनी अखेर गावच विकायला काढलंय. हिंगोली जिल्ह्यातील ताकतोड हे गाव गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळं राज्यात खळबळ उडालीय.

ताकतोडा गावाकऱ्यांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा करणंही या गावकऱ्यांनी सोडून दिलं. अखेर शेवटचा पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांना गाव विकत घेण्याची विनंती केली आहे. मायबाप सरकारनं याकडं लक्ष देण्याची गरज आहे.

ताकतोडा गाव हे 3 हजार लोकसंख्या असणारं गावं. या गावकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं एकच साधन ते म्हणजे शेती. पण शेतीजमीन कोरडवाहू आणि पाचवीला पुजलेला दुष्काळ यामुळं शेतं पिकवायची तरी कशी..? हा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय.

हंगामी पावसाच्या चार थेंबानं माती ओली केली की कपाशी सोयाबीनसारखी पिकं घेतली जायची. मात्र मागच्या चार वर्षापासून त्या पावसानही पाठ फिरवलीय.

बँकांच्या आडमुठ्या धोरणांमुळं शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिलाय. म्हणून खासगी बँकांचे सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या केल्या. चार वर्षापासून पीककर्ज मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.

सरसकट कर्जमाफी मिळावी, पीकविमा मिळावा, हिंगोली जिल्हा केंद्रशासित घोषित करावं, रोजगारासाठी हिंगोलीत एमआयडीसी सारखे प्रकल्प उभारावेत आणि गावावरील खासगी फायनान्स कर्ज माफ करावं, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. 

गावाच्या मागण्या मान्य करा अन्यथा संपूर्ण गावकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी ताकतोडा गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-भाजप आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार; शिवसेनेला डिवचण्याचे प्रयत्न??

-मतदारांची माहिती आधारला लिंक करा; फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे मागणी

-“सरकारवर टीका करायची आणि पुन्हा एकत्र बसायचं ही शिवसेनेची नाटकबाजी”

-बाळासाहेब ठाकरेंची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी व्हावी; शिवसेनेची मागणी

-“युतीचा विचार सोडून निवडणुकीच्या तयारीला लागा”