शिक्षणमंत्री विनोद तावडेंची मुजोरी; शुटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश

अमरावती : राज्यात लोकशाही आहे की हिटलरशाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला तू शिकू नकोस, असं अजब उत्तर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं. तसंच या प्रसंगाचं मोबाईलमध्ये शुटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीही मंत्र्यांच्या या आदेश तात्काळ पाळले. अमरावतीमध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

नेमका काय प्रकार घडला?-

आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?, असा प्रश्न विनोद तावडे यांना विचारण्यात आला होता. विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर विनोद तावडे चांगलेच संतापले. ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असं धक्कादायक उत्तर त्यांनी संबंधित विद्यार्थ्याला दिलं. याच प्रसंगाचं चित्रीकरण करणा-या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश देखील त्यांनी दिले. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी ही घटना घडली. मंत्र्यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी शुटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन वाहनात डांबून ठेवलं. इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला, त्यानंतर त्या विद्यार्थ्याला सोडून देण्यात आले.

माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षणमंत्री जायला निघाले. मात्र विद्यार्थ्यांनी गलका केल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. तेव्हा प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने वरील प्रश्न विचारला होता. मात्र शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे यांना तो प्रश्न रूचला नाही.

विद्यार्थ्याच्या अटकेच्या आदेशानं खळबळ-

विनोद तावडेंचा जो प्रश्न रुचला नाही त्यावेळी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या प्रश्नोत्तराचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होते. तावडेंच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी शूटिंग बंद करण्यास सांगितलं. तसेच झालेले शुटिंग डिलीट करण्यास बजावलं. विद्यार्थ्यांनी मात्र त्या आदेशास जुमानलं नाही. युवराज मनोहर दाभाडे नावाच्या विद्यार्थ्याने रेकॉर्डिंग सुरूच ठेवले. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आलं, मात्र हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असं बाणेदार उत्तर युवराजनं दिलं. युवराजच्या या बाणेदार उत्तरावर तावडे चांगलेच संतापले. माझी ‘प्रायव्हसी हर्ट’ होत असल्यामुळे या विद्यार्थ्याला ताबडतोब अटक करा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.

विद्यार्थ्याला डांबले, मोबाईल हिसकावून घेतला-

मंत्र्यांनी विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश देताच पोलिसांनी लगेच कारवाई केली. युवराज पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचा मोबाइल हिसकावून घेण्यात आला. त्याला जवळच्याच वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थी वाहनामागे धावत गेले. त्यांनी युवराजला सोडण्याचा धोशा लावला. काही शिक्षकांनी देखील विनोद तावडे यांना युवराजला सोडण्याची विनंती केली. मात्र त्यावर तावडे काहीच बोलले नाहीत.

मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर पोलिसांनी युवराजला पोलीस वाहनातून उतरवलं आणि सोडून दिलं. त्याचा मोबाईल मात्र पोलिसांनी दिला नाही.

तुमचा चेहरा मंत्रिमहोदयांना दाखवू नका-

युवराजचा जप्त केलेला मोबाईल घेण्यासाठी काही विद्यार्थी मंत्री असलेल्या व्हीएमव्ही कॉलेजमध्ये गेले. त्याठिकाणी ते मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांना भेटले. मंत्रिमहोदय फार संतापले आहेत. त्यांना तुमचा चेहरा दाखवू नका, असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं. दीड तासांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यातून मोबाईल घेऊन जा, असं त्यांना सांगण्यात आलं.