वाल्मिक कराड गँगविरोधात सर्वात मोठा पुरावा सापडला, ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Walmik Karad | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल, असा पुरावा समोर आला आहे. हा वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे.

29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

विष्णू चाटेच्या केजमधील सीसीटीव्ही फुटेज-

हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेरचे आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड (Walmik Karad) या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय (PSI) राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्येही संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राजेश पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह-

आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला (Walmik Karad) का भेटले असावेत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता सीआयडी (CID) आणि एसआयटीकडून (SIT) राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ –

या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याच्यावतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला.

हा सुरक्षा रक्षक संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील होता. त्यामुळे संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला होता. यानंतर ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

News Title : Walmik Karad New evidence links