खेळ

आईला विचारुन आलायेस ना?; वसीम अक्रम छोट्या सचिनची खिल्ली उडवतो तेव्हा…

सचिन तेंडुलकर आणि वासिम अक्रम ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन मोठी नावं आहेत. सचिनने भारताकडून अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर वसीम आक्रमक दिग्गज पाकिस्तानी खेळाडू होता. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे त्याने जगाला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. क्रिकेटमध्ये किस्से तसे वरचेवर घडत असतात मात्र सर्वच किस्से समोर येतात असं नाही. सचिन तेंडुलकर आणि वसीम अक्रम यांच्यात मैदानात घडलेला असाच एक किस्सा नुकताच समोर आला आहे. 

कुणी सांगितला हा किस्सा?

मैदानाबाहेर सचिन आणि वासिम अक्रम हे दोघं चांगले मित्र आहेत. मात्र तरीही मैदानात या दोघांमध्ये चांगलीच खुन्नस असायची. कारण भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की ते एकप्रकारचं युद्धच असायचं. हा किस्सा सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या पहिल्याच सामन्यातला आहे. स्वतः वसीम अक्रमने हा किस्सा सांगितला आहे. इंडिया टुडे वृत्तसमुहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो बोलत होता. 

नेमका काय आहे किस्सा?

सचिनने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ते साल होतं 1989… वसीम अक्रमने त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा चांगलाच दबदबा प्रस्थापित केला होता. जगातील दिग्गज फलंदाज वसीम अक्रमच्या गोलंदाजीचा सामना करताना बिचकत असत. 

सचिन नवीन असला तरी पाकिस्तानी खेळाडूंमध्ये त्याच्या नावाची चांगलीच चर्चा होती.

“आम्ही सचिन तेंडुलकरबद्दल ऐकलं होतं. त्याच्या फलंदाजीविषयीही आम्ही थोडी माहितीसुद्धा घेतली होती. तो फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा आम्ही त्याला चिथवण्याचा प्रयत्न केला. आईला विचारुन आलास का?, असा प्रश्न मी त्याला विचारला होता” – वसीम अक्रम, माजी पाकिस्तानी गोलंदाज

पुन्हा पहायला मिळणार भारत-पाकिस्तान सामने-

अनेक वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सध्या आशिया चषक सुरु आहे या स्पर्धेत हे दोन दिग्गज संघ एकमेकांशी दोन हात करतील. दोन्ही संघांमधील पहिला सामना19 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तानने आशिया चषकात चांगली सुरुवात केली आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तान आणि भारत या चषकाचे मुख्य दावेदार मानले जात आहेत.

IMPIMP