“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत?”

मुंबई | राज ठाकरेंना माझं एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं, असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं.

सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर मनसेने देखील पलटवार केला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी सुजातवर काय प्रकारचे संस्कार झालेत?, असा सवालही मनसेनं विचारला आहे.

मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सुजात यांच्यावर पलटवार केला आहे. तर, अविनाश जाधव यांनीही सुजातचा हा प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.

मुलगा चांगला बोलतोय, राजकारणात पुढे येईल. पण, जातीपातीचं राजकारण सुजातला शिकवू नका, अशा प्रकारचे संस्कार मुलाला देऊ नका, असा सल्ला मनसेचे अमेय खोपकर यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, मग ती बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा-कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितलयं की, दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. पण, त्यांच्या वक्तव्यावर प्रभावी होऊन, या दंगलीत सहभागी होतात ते जास्त करुन बहुजन पोरं असतात, असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलंय.

दरम्यान, औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.