जितेंद्र आव्हाडांच्या गंमतीची अजित पवारांनी केली व्याजासकट परतफेड

पुणे | पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसनच्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अजित पवारांच्या फटकेबाजीने कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. जितेंद्र आव्हाडांनी आपल्या भाषणात अजित पवारांची जरा गंमत केली पण अजित पवारांनी त्यांच्या भाषणात गंमतीची व्याजासकट परतफेड केली.

दादांचा जेवढा उरक आहे तेवढा आमचा नसेल. जरा यापुढचे कार्यक्रम अकरा नंतर घेतले तर जरा बरं होईल. आमची झोप पूर्ण होत जाईल. प्रवासाचा वेळही तेवढा कमी होईल, अशी टिप्पणी आव्हाडांनी केली. त्यावर शरद पवार साहेबांचं राजकारण, समाजकारण मी जवळून पाहिलेलंय. पवारसाहेब कितीही लेट झोपले तरी सकाळी सातला कामाला सुरूवात करतात. त्यामुळे मलाही त्यांचीच सवय लागल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

जितेंद्र, सकाळी लवकर आवरून ठाण्यातून सकाळी चारला निघाला असतास, तर इथे पुण्यात सातला पोहचला असतास लेका…, असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.

दरम्यान, नाशिक दौऱ्यात अजित पवार यांनी सकाळी लवकरच एका ग्रामपंचायतीचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळीही दादांनी तिथल्या पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-

मनसेत प्रवेश करताच जाधवांची गर्जना; ‘आता चंद्रकांत खैरे खासदार होणे नाही…!’

-दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!

-साहेब, हेल्मेट तुटलंय, पैसे संपलेत मला पकडू नका; पुणे पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

-झेंडा आणि अजेंडा बदलताच राज ठाकरेंचा जुना भिडू पक्षात परत!

-52 वर्ष, सलग 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं…; आळंदीच्या कार्यक्रमात शरद पवार भावूक