…म्हणून एकमेकांचे कट्टर विरोधक थोरात-विखेंनी केला एकत्र विमान प्रवास!

शिर्डी | नगर जिल्ह्याच्या राजकारणात एकाच पक्षात असूनही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली ती घराणी म्हणजे थोरात-विखे पाटील…. लोकसभा निवडणुकीत देखील याचा प्रत्यय आला. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर आजचा दिवस मात्र त्याला अपवाद ठरला. आज सकाळी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार सुजय विखे यांनी एकत्रित विमान प्रवास केला.

आज(सोमवारी) सकाळी 10. वाजताचं दोघा नेत्यांचं शिर्डीवरून दिल्लीसाठी स्पाईस जेटच्या विमानाचं बुकिंग होतं. या विमानात बिझनेस क्लासमध्ये योगायोगाने दोघांनाही शेजारीच जागा मिळाली. म्हणून त्यांनी एकत्रित विमान प्रवास केला.

थोरात-विखेंचा विमान प्रवास हा नगरकरांसाठीच नव्हे तर राज्यातील लोकांसाठी चर्चेचा विषय बनला अन् मग चर्चा सुरू झाली ती निवडणुकीनंतर आणि थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोघांनी एकत्रित प्रवास केला… त्यांच्यात काय चर्चा झाली असेल…?

गेल्या अनेक वर्षांपासून थोरात-विखेंमध्ये वाद आहेत. ऐन लोकसभेच्या तोंडावर राधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय यांनी भाजपात प्रवेश केला. या काळात थोरात-विखेंनी एकमेकांवर जहरी टीका केली. राधाकृष्ण विखे त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांनी नगरसह शिर्डीच्या जागेवर भाजपचा प्रचार केला आणि दोन्हीही जागा भाजपला मिळवून दिल्या.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलीये. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व थोरात यांच्याकडे दिलं गेलंय. मात्र असं असलं तरी थोरातांना होम-ग्राऊंडवर विखेंचा सामना करावा लागेल.

दरम्यान, विमानात शेजारी शेजारी बसलेल्या थोरात विखेंचे फोटो सोशल मीडियात वाऱ्याच्या वेगात व्हायरल झाले.