मुंबई |मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर , जयंत पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई उपस्थित होते.
त्यांवेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी भाजपाच्या वतीने खालील मुद्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.
1) राज्यातील आरोग्य व्यवस्था अतिशय वाईट असून पूर्णतः कोलमडली आहे. सायन रुग्णालयात तर मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना आता बेड्स मिळणे कठीण झाले आहे. कोरोना नसलेल्या रुग्णांचे सुद्धा मोठे हाल होत आहेत. आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाने यात तत्काळ लक्ष घालावे.
2) कोरोना रूग्णांच्या संपर्कात येणार्यांचा शोध आता थांबला आहे. लक्षणे नसलेल्यांच्या चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. रुग्ण तसेच मृतांची संख्या दडविण्याचे प्रकार अतिशय गंभीर आहेत, यात सुद्धा सरकारने लक्ष द्यावे.
3) क्वारंटाईन सेंटर्सची अवस्था तर अतिशय वाईट आहे. तेथे निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात आहे. याकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यावे.
4) अधिकार्यांमध्ये योग्य समन्वय नाही. अशाप्रसंगी राजकीय नेतृत्वाने हा समन्वय घडविला पाहिजे.
5) स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर आहे. सुमारे 25,000 मजूर पायी रस्त्याने प्रवास करीत आहेत. केंद्र सरकार रेल्वेसेवा देण्यास तयार आहे. त्यामुळे त्यांना पायी जाण्यापासून रोखून तत्काळ रेल्वेने प्रवास करता येईल, हे सुनिश्चित करावे.
6) रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याबद्दलच्या तक्रारी कायम आहेत. जे धान्य दिले जातेय ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. रेशनकार्ड नसलेल्यांना पण इतर छोटी राज्ये धान्य देत आहेत. महाराष्ट्राने सुद्धा ते करावे.
7) मालेगाव येथे मागच्यावर्षीच्या तुलनेत मृतांची वाढलेली संख्या पाहता तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात याव्यात व त्याप्रमाणात उपचारांची व्यवस्था उभी करण्यात यावी.
8 )शेतमाल खरेदी थांबलेली आहे, कारण खरेदीसाठी पुरेशी यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. पुढचा हंगाम तोंडावर असताना तूर, कापूस, हरभरा शेतकर्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे शेतमाल तत्काळ खरेदी करावा आणि आगामी खरीप हंगामासाठी शेतकर्यांना मदत करावी.
9) सातत्याने होणार्या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोबल खूप मोठ्या प्रमाणात खचले आहे. सातत्याने कामावर असल्याने ते थकले सुद्धा आहेत. अनेक पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले, पण त्यांना उपचार मिळत नाहीत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
10) लॉकडाऊन असला तरी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. विविध क्षेत्रांसाठी टास्क फोर्स तयार करून ते क्षेत्र खुले कसे करायचे, याचे प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश शासनाने द्यावेत.
11) मुंबई महापालिकेकडून विविध शुल्क वाढविले जात आहेत. शासनाने आता ते कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने सुद्धा अर्थव्यवस्थेला चालना देणारे निर्णय घ्यावेत.
12) असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट त्यांच्या बँक खात्यात मदत दिली गेली पाहिजे.
दरम्यान, आम्ही पूर्णतः सरकारसोबत आहोत! ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी सांगतात. आम्ही ते पाळतो. पण सत्ताधार्यांनी सुद्धा याचे पालन केले पाहिजे. वारंवार आणि विनाकारण केंद्र सरकारकडे बोट दाखविणे योग्य नाही. असही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-परप्रांतीय गावी गेल्याने उपलब्ध रोजगार स्थानिकांना द्या; राज ठाकरेंची मागणी
-लॉकडाऊन शिथील करायच्या वेळी तुमचा प्लॅन काय असणार? राज ठाकरेंचा सरकारला सवाल
-मजुरांचे जथ्येच्या जथ्ये सरकारला अशोभणीय; लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर भुजबळ यांची नाराजी
-दारूच्या 65 कोटी महसुलाच्या बदल्यात 65 हजार कोरोना संक्रमण विकत घेणं परवडणारं नाही- संजय राऊत