कोरोनाचा धोका टाळण्यासाठी….., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक सूचना

मुंबई |  कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे राहील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनी २ किमी अंतराचे निर्बंध टाकले त्यामागे मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखणे हाच उद्देश आहे असे स्पष्ट केले.

पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू यांनीही या बैठकीत सहभाग घेऊन सूचना केल्या. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर राजीव, बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, वाहनांची गर्दी होणार असेल तर तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही धोका वाढवित आहात हे लक्षात ठेवा.”

“तुमच्या घराच्या आसपासच्या भागामध्ये किराणा, अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधी, भाजीपाला हे सर्व काही मिळू शकते अशी परिस्थिती आज मुंबईत आहे. तुम्हाला सकाळी, संध्याकाळी उद्याने , मैदाने यांमध्ये जायचे आहे तर नजीकच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आता तर आपण अनेक व्यवहार खुले केले आहेत, त्यामुळे नागरिक म्हणून जबाबदारीने वागणे पण गरजेचे आहे”.

महत्वाच्या बातम्या-

-जगातला सगळ्यात मोठा प्लाझ्मा ट्रायल प्रोजेक्ट, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

-“चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झालं?”

-शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी

-…तो पर्यंत शहीद झालेल्या 20 जवानांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही- अरविंद केजरीवाल

-“पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई?”