जगभरात कोरोनाने चांगलाच हाहाकार माजवलेला आपण सर्वांनी पाहिलं. जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केलाय, आता हा आकडा एकूण 24,93,28,086 वर पोहोचला आहे. तर 50,44,892 लोकांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे वेगवेगळे वेरियंट आलेले देखील या दरम्यान पहायला मिळाले, मात्र योग्यवेळी उपचार मिळाल्यानं अनेकांनी कोरोनावर मात केली. तब्बल 22,58,22,793 जण कोरोनावरील उपचारानंतर बरे झाले आहेत. जग कोरोनाच्या तडाख्यातून सावरत असताना आता कोरोनाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या जीवघेण्या संकटाला हलक्यात घेणं आता मानवाला जीवघेणं ठरू शकतं, अशी शक्यता आहे. एकूणच मानवाने या आजाराबद्दल दाखवलेला हलगर्जीपणा नडतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनाची नवी लाट येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. तब्बल 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका निर्माण झाला असून WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत गंभीर इशारा देखील दिला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे जगभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात पार पडली आहे, मात्र असं असलं तरी कोरोनाचा धोका कमी होण्याचं नाव घेत नाहीये. लसीकरणानंतरही युरोप कोरोना महामारीचं केंद्र झालं आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे, मात्र काही देशांनी जगाचं टेन्शन वाढवलं आहे.
तब्बल 53 देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या आणखी एका लाटेचा धोका निर्माण झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यातील बरेच देश आधीच महामारीच्या नवीन लाटेचा सामना करत आहेत आणि हे अत्यंत धक्कादायक मानलं जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हॅन्स क्लुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर वाढू लागली आहे. या भागात कोरोना महामारीच्या प्रसाराचा वेग ही बाब गंभीर चिंतेचा विषय बनत चालली आहे.
सर्वात धोक्याची बाब म्हणजे अशी परिस्थिती राहिली तर फेब्रुवारीपर्यंत आणखी 5 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जगभरात लसीकरण मोहिमेनं वेग घेतला असताना देखील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे हे चिंताजनक आहे.
आपण महामारीच्या उद्रेकाच्या एका अत्यंत गंभीर टप्प्यावर उभे आहोत. युरोप पुन्हा एकदा साथीच्या रोगाच्या केंद्रस्थानी आहे, जिथे आपण एक वर्षापूर्वी होतो, असं डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील संघटनेच्या युरोप मुख्यालयात डॉ. हॅन्स क्लुज यांनी पत्रकारांना सांगितलं.
डॉ. क्लुज पुढे म्हणाले, “जमेची बाब ही आहे की यावेळी आरोग्य अधिकार्यांना व्हायरसबद्दल योग्य माहिती आहे, सोबत महामारीसोबत लढण्यासाठी चांगली साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठीचे उपाय योग्य पद्धतीनं न केल्याने आता असं होत आहे.”
काही भागांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे याचं कारण देखील डॉ क्लुज यांनी सांगितलं आहे. कोरोना लसीकरणाचा कमी वेग हे यामागील मुख्य कारण असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात 53 देशांमध्ये कोविडमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
परिस्थिती अशीच राहिली तर फेब्रुवारीपर्यंत या देशांमध्ये साथीच्या आजारामुळे आणखी 5 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या प्रदेशात आठवडाभरात 18 लाख नवीन प्रकरणं समोर आली आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयाने सांगितले आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत आता 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या आठवडाभरात 24,000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर मृतांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत बातमी दिली आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू या देशांमध्ये झाले आहेत आणि ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे.
आता कोरोनाच्या या नव्या लाटेचा धोका काही मोजक्या देशांना असला तरी जगाचं टेन्शन वाढलं आहे, कारण या देशांमध्ये जरी कोरोनाचे रुग्ण वाढले तरी त्याचा पुन्हा जगभर प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून केलं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही”
कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट; ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ