निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पावसाचा तडाखा, पाहा कुठे कुठे आहे पावसाचा जोर?

मुंबई | कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट ओढावले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीला बसणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.

मुंबईत काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाचा जोर अद्याप कायम आहे. मुंबईत गेल्या 12 तासात 20 ते 40 मिलीमीटर इतका पाऊस झाला. मुंबईतील कुलाबा, दादर, जुहू आणि मरिन ड्राईव्ह या परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समु्द्राजवळील किनारपट्टीच्या भागांमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

वसई विरार, नवी मुंबईत रिमझिम पाऊस

वसई विरार क्षेत्रात चक्रीवादळाचे संकट आहे. प्रशासनाकडून लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वसई-विरार क्षेत्रात रात्रीपासून रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सध्या नवी मुंबईत तुरळक स्वरुपाचा पाऊस पडत आहे. वाशी टोल नाक्यावर सुद्धा गाड्यांची वाहतूक मध्यम स्वरूपात सुरळीत सुरु आहे. पालघरमध्ये काल संध्याकाळ पावसाने जोर पकडला आहे. समुद्रात लाटाही उसळत आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम, वीज पुरवठा खंडित

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. पहाटेपासून वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरीतील मंडणगड. दापोली आणि गुहाघरला सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात रात्रभर रिमझिम पडणारा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

तर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात रिमझिम पाऊस होत आहे. पहाटेपासून अनेक भागात पाऊस पाहायला मिळत आहे. सलग चौथ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी (Cyclone Nisarga Mumbai Rain) लावली.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यपालांनी सरकारचा ‘तो’ आदेश फिरवला, आता नवा वाद सुरु

-‘डॉ. श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशीप’ कार्यक्रमाची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून घोषणा

-पुण्यात आज 169 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

-राज्यात कोरोनामुक्त पोलिसांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 35 पोलिसांना डिस्चार्ज

-संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू- उद्धव ठाकरे