‘ट्रायबेकॉन’ परिषद म्हणजे राजकारणाच्या पलिकडे जाऊन माणसांच्या पिढ्यांच्या उन्नतीचे काम – डाॅ. राजेंद्र विखे

अहमदनगर | ‘राजकारणाच्या पलिकडे जाऊन माणसांच्या उन्नतीचे काम केले पाहीजे’ हा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आज ही प्रवरा परिसरात आम्ही अभिमानाने जोपासतो आहोत. शिक्षण आणि रोजगारासोबत आरोग्यासाठी जागतीक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत आहोतच पण समाजातील शेवटचा माणुस हा विकासाचा केंद्रबिंदु असला पाहीजे या हेतुने आजही विकासाच्या गतिचक्रात अडगळीत पडलेल्या अदिवासींच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होते आहे. म्हणून गेली १० वर्ष प्रवरा परिवार अकोले तालुक्यातील आदिवासी समाजातील नागरिकांसाठी शिक्षणसेवा देण्यासोबत आरोग्यसुविधा देत आहे. मात्र तरीही आदिवासींच्या आरोग्याकडे होत असलेले शासन स्तरावरील दुर्लक्ष आणि त्यातील त्रुटींवर सकारात्मक पध्दतीने शासनाशी पत्रव्यवहार करुन त्यात सुधारणा घडवून आणण्याचे कार्य आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत. यंदा या प्रक्रियेत अधिक पुढे जात देशातील पहिल्या आदिवासी आरोग्य परिषदेचे आयोजन करुन आदिवासी समाजाच्या आरोग्य प्रश्नावर व उत्तरावर चर्चा घडवण्याची आमचा उद्देश आहे असं प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे प्रकुलपती डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांनी ‘महाराष्ट्र केसरी’शी बोलतांना व्यक्त केलं आहे.

प्रवरा ट्रस्टच्या पुढाकाराने येत्या १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ट्रायबेकॉन ही राष्ट्रीय परिषद होत आहे. या निमित्ताने. डाॅ राजेंद्र विखे पाटील यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या, स्वच्छंदी, स्वतंत्र वृत्तीच्या आणि आधुनिक जीवनशैली पासून दूर असणाऱ्या आदिवासींचे जीवन सुखमय तसेच अनुकरणीयही वाटते, मात्र दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या या आदिवासींच्या समस्यांचा विचार फारसा केला जात नाही.

काही संस्थांच्या प्रयत्नांमधून मोजकी आदिवासी गावं आता विकासाच्या प्रवाहात जोडली जाऊ लागली आहेत.. मात्र देशभरात लोकसंख्येच्या ८.६ टक्के असलेले हे आदिवासी लोक आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. जगातील आदिवासी लोकसंख्येच्या एक तृतीयांश म्हणजे जवळपास दहा कोटी आदिवासी लोक भारतात ७०५ विविध आदिवासी जमातींमध्ये विखुरले गेले आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव असणाऱ्या आदिवासी वाड्या-वस्त्या, पाड्यांवर आजही परंपरागत जीवनपद्धती आढळते.

सामाजिक सुधारणांची चर्चा करताना आदिवासींचे प्रश्न मात्र सातत्याने दुर्लक्षित राहिले आहेत. आजही आदिम अवस्थेत जगणारे आदिवासी मुक्त असतात, स्वतंत्रपणे जगतात, म्हणून त्यांचे काही प्रश्नच नाहीत, अशी प्रस्थापित समाजाची धारणा असते. जल, जमीन आणि जंगलावरच्या प्रस्थापितांच्या आक्रमणामुळे आदिवासींना त्यांच्याच मूलभूत हक्कांसाठी लढावं लागत आहे. दुर्गम भागात वास्तव्य असल्यामुळे आणि जीवनावश्यक पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे आदिवासींना आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात. कुपोषण तसेच आधुनिक उपचारांच्या अभावी मातामृत्यू, बालमृत्यू अशा भयावह समस्यांनी ते त्रस्त आहेत.

महात्वाच्या बातम्या-