भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात चक्क चौथ्यांदा चोरी

जालना : राज्याची सत्ता सध्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी याच पक्षाची आहे. मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृह विभागाची जबाबदारी आहे. मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं चित्र आहे. दुसरं तिसरं कुणी नव्हे तर ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना याचा फटका बसला आहे. रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात चोरी झाली आहे. दानवेंच्या कार्यालयात चोरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी तब्बल तीन वेळा त्यांच्या कार्यालयात चोरी झाली आहे. 

नेमकी कशी आणि कुठं घडली घटना?

रावसाहेब दानवे यांचं जालन्यात मोरेश्वर सप्लायर्स नावाचं कार्यालय आहे. हेच कार्यालय चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. हे कार्यालय चोरट्यांनी फोडलं आहे. खरंतर या कार्यालयामध्ये वॉचमन असतो. मात्र तीन चोरट्यांनी या वॉचमनच्या गळ्याला चाकू लावला आणि खिडकी फोडून कार्यालयात प्रवेश केला. चोरट्यांनी पहिले तर कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि त्यानंतर सीडीआरसह कार्यालयातून 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

पोलिसांनी काय कारवाई केली?

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाजप प्रदेशाध्यक्षांंचं कार्यालय फोडलं म्हटल्यावर गांभीर्याने तपास सुरु झाला. चोरट्यांनी तर कार्यालयातील सीसीटीव्ही फोडून सीडीआर लांबवला होता, त्यामुळे कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं नाही. मग पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? याची चाचपणी केली. तिथलं सीसीटीव्ही फुटेज गोळा करुन पोलिसांनी ते नीट तपासलं. या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी दोन चोरांना अटक केली आहे.

कोण आहेत कार्यालय फोडणारे चोरटे?

अर्जुनसिंग छगन सिंग भोंड आणि अर्जुनसिंग प्रीति सिंग कलाणी अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत. या दोघांनाही पोलिसांनी जालन्यातून अटक केली आहे. या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर या प्रकरणात आणखी एक चोरटा आहे. पकडलेल्या दोघांनी त्याची माहिती पोलिसांना दिली असून त्याआधारे पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत असल्याचं कळतंय.

चोरट्यांनी याआधी तीनदा फोडलं कार्यालय-

रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात चोरी होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही तीन वेळा दानवेंच्या कार्यालयात चोरी झाली होती. दानवे यांचं कार्यालय फोडण्यात आलं होतं. त्यांच्या कार्यालयात चोरी होण्याची ही चौथी घटना आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या कार्यालयात चार-चार वेळा चोरी झाल्यानं या घटनेची परिसरात एकच चर्चा आहे.