“पैसे गोळा करून पचवले आणि ढेकर दिलीत, आता तुमचं ऑपरेशन करावं लागेल”

मुंबई | देश, देव आणि धर्म एकच आहे. हे देशासाठी गोळा केलेले पैसे होते. तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल. तुम्ही ते पैसे गोळा करून पचवलेत आणि ढेकर दिली आहे. आता तुमचं ऑपरेशन तर करावं लागेल, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पोलिसांनी काय समन्स पाठवलेत, हे मला माहिती नाही. पण जबाबासाठी समन्स पाठवल्याचं कळतंय. त्याशिवाय, आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून कोट्यवधी गोळा करणारे दोघं बापबेटे पोलिसांसमोर जायला घाबरत आहेत. म्हणून ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आहेत. पण कर नाही तर डर कशाला ही तुमचीच भाषा आहे ना? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

तुम्ही आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. 58 कोटी रुपये गोळा केले. हा पोलीस तपासाचा भाग आहे. तुम्ही पैसे गोळा केले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धर्मादाय आयुक्तांनी देखील यांच्यावर कारवाई करायला हवी. त्यांच्या परवानगीशिवाय असे पैसे गोळा करता येत नाहीत. देवळात पेटी ठेवता त्याचा देखील हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो, असं राऊत म्हणाले.

तुम्ही ज्या प्रमाणे शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी करत आहात. अशा प्रकारची भाषा वापरतात. म्हणजे तुमच्या संघाच्या शाखेमध्ये याच भाषेचे वर्ग घेतात का? साधनशुचिता असे शब्द वापरतात. ते कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्राला ही घाण साफ करावी लागेल आणि आता ती वेळ आली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर नाही तर विरोधी पक्षातील काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आमची माणसं गायब झाली’; आंदोलक कर्मचाऱ्यांचा खळबळजनक दावा 

मुंबई पोलिसांचा किरीट सोमय्यांना मोठा झटका! 

‘मी भारतातील लोकांना…’; इम्रान खान यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतुक 

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच गुणरत्न सदावर्तेंचा अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…