जानकरांच्या पक्षाचा भुंगा, घालतो ‘कमळा’भोवतीच पिंगा; शिवसेनेची ‘सामना’तून टीका

मुंबई : धनगर समाजाचे नेते, राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर शिवसेनेने आगपाखड केली आहे. आपला पक्ष ‘कमळ’ चिन्हावर लढणार नाही, असे जानकर म्हणत असले तर गेली पाच वर्ष त्यांच्या पक्षाचा भुंगा कमळाभोवती पिंगा घालत आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

जानकरांनी रविवारी मुंबईत धनगर समाजाचा मेळावा घेतला होता. त्यात संजय दत्तने जानकरांना व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. संजय दत्त पुढील महिन्यात ‘रासपा’त प्रवेश करणार आणि पक्षाचा जोरदार प्रचार करणार असं जानकरांनी त्यानंतर जाहीर केलं. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जानकरांचा समाचार घेतला.

धनगर समाजाचे किती प्रश्न जानकरांनी सोडवले, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. संजय दत्त रासपत तर शाहरुख, अक्षय आठवलेंच्या पक्षात आणि सलमान वंचित आघाडीत जाणार का, अशी रेवडी सेनेने उठवली.

सरकारने धनगर समाजासाठी जाहीर केलेल्या अनेक योजना आजही कागदावरच आहेत. या समाजासाठी मेंढी पालनासाठी जागा, वसतिगृहे, घरे, नोकऱ्या, चरई अनुदान वगैरैंच्या केवळ घोषण झाल्या आहेत.

धनगर तरुणांवर विविध आंदोलनांमध्ये दाखल झालेले गुन्हे कधी मागे घेतले जाणार? हे प्रश्नांचा पाठपुरावा करण्याऐवजी जानकर सिनेमावाल्यांना पक्षात घेत आहेत. सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-