मायावतींना जोरदार धक्का; 6 आमदारांनी घेतला ‘हाताला साथ’ देण्याचा निर्णय!

जोधपूर | बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना जोरदार धक्का बसला आहे. राजस्थानमधील त्यांचे 6 आमदार निवडून आले होते. त्यांच्या 6 पैकी 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या 6 आमदारांनी राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांना सोमवारी रात्री उशीरा याबाबतचं पत्र दिलं आहे. याअगोदर बसपाच्या या सर्व आमदारांचा काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा होता.

विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यापूर्वी बसपाच्या या सहाही आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली होती. मला त्यांचे विलिनिकरणाबाबतचे पत्र मिळाले आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. मंगळवारी यावरील प्रक्रिया पार पाडली जाईल, असंही सी. पी. जोशी यांनी सांगितलं आहे.

बसपाच्या आमदारांनी यापूर्वी काँग्रेस सरकारमध्ये सामिल न होता बाहेरुन पाठींबा दिला होता. त्यामुळे सरकार अस्थिर स्थितीत होते.

आता मात्र हे आमदार काँग्रेसमध्ये सामिल झाल्याने सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे राजस्थानातील 200 जागांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या 106 झाली आहे. सध्या या विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत.

राजस्थानमधील ही परिस्थिती पाहता काँग्रेससाठी हा मोठा विजय मानला जात आहे. कारण, आगामी काळात राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येऊ घातल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-