मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही झाले, वाचा कोणाकडे कोणतं खातं?

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. गेला महिनाभर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीश्वरांना लोटांगने घातली. अखेर त्यांना हवा तो आशिर्वाद प्राप्त झाला.

पहिल्या फेरीत शिंदे यांच्या गोटातील 9 आणि भाजपचे 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत गुवाहाटीला बंड करुन गेलेल्या अपक्ष आमदारांच्या तोंडाला मात्र आघाडीने पाने पुसली.

मंगळवार दि. 09 ऑगस्ट रोजी 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्यानंतर लागलीच रात्री त्यांना खातेवाटप देखील जाहीर झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांचे जुने नगरविकास खाते ठेवण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री आणि नगरविकास खाते आहे. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) हाती उपमुख्यमंत्री, गृह आणि अर्थ अशी जड आणि महत्वाची खाती ठेवण्यात आली आहे.

नव्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल मंत्री केले गेले आहे. तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सार्वजनिक बांधकाम हे खाते देण्यात आले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत ऊर्जा आणि वनविभाग खाती देण्यात आली आहेत. तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे विधी आणि न्याय खाते देेण्यात आले आहे.

रविंद्र चव्हाण यांना गृहनिर्माण आणि माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना उद्योग हे मोठे अवजड खाते देण्यात आले आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राष्ट्रवादीचे माजी नेते दीपक केसरकरांना पर्यावरण आणि पर्यटन खाते देण्यात आले आहे.

सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय खाते मिळाले आहे. दादा भुसे महाराष्ट्राचे नवे कृषीमंत्री झाले आहेत. तसेच ज्यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळा प्रकरणात आली ते अब्दुल सत्तार अल्पसंख्यांक विकास मंत्री होणार आहेत.

गुलाबराव पाटील आता नव्या मंत्रिमंडळात पाणीपुरवठा मंत्री झाले आहेत. गिरीश महाजन यांना जलसंपदा, विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास खाते मिळाले आहे आणि अतुल सावे हे आरोग्य मंत्री झाले आहेत.

तानाजी सावंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झाले असून, संजय राठोड यांना ग्रामविकास खाते मिळाले आहे. शंभूराज देसाई उत्पादन शुल्क खात्यावर मंत्री आहेत तर संदीपान भुमरे रोजगार हमी खात्याचे मंत्री झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शिंदेंच्या निर्णयावर अपक्षांची नाराजी?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणाले…

संघपरिवारातील संघटनेकडून शिंदे सरकारला विरोध?; महत्त्वाची माहिती समोर

गंभीर आरोप असलेल्या ‘या’ नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

मोठी बातमी! बिहारमध्ये नितीश कुमारांचा भाजपला जोर का झटका

शिंदेंच्या मंत्रिमंडळात सगळेच कोट्यधीश; जाणून घ्या सर्वात श्रीमंत मंत्री कोण?