संभाजीराजेंच्या उपोषणानंतर सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या; वाचा सविस्तर

मुंबई | मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आझाद मैदानावर जाऊन संभाजीराजेंशी चर्चा केली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी लेखी आश्वासन देखील दिलंय.

मागण्या मान्य झाल्यावर तीन दिवसांनंतर संभाजीराजे यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण स्थळी एकनाथ शिंदे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाची यादी वाचून दाखवली.

मराठा समाजाच्या या मागण्या मान्य झाल्या-

1. मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सरकारने सांगितलं.

2. एसईबीसी आरक्षणातंर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी नोकऱ्या मिळाल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

3. सारथीच्या व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून 2022 पर्यंत पूर्तता करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय.

4. सारथी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च 2022 पर्यंत भरणार असल्याचं देखील राज्य सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात येणार आहे.

5. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला उर्वरित 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

6. मराठा समाजातील बांधवांना कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाही यासाठी व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करून व्याज परतावा देऊ, असं आश्वासन देखील देण्यात आलं आहे.

7. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज फेडताना व्याज परताव्यासाठी नवीन पॉलिसी ठरवण्यात येणार आहे. तर कर्जाची मुदत देखील वाढवण्यात आलीये.

8. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी आता महासंचालक आणि इतर कर्मचारी देखील नियुक्त करण्यात येणार आहेत.

9. कोपर्डी प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाधिवक्त्यांना विनंती करणार असल्याचं सरकारने सागितलं आहे.

10. वसतीगृहाची यादी मागवून लवकरात लवकर पाठपुरवढा करण्यात येणार आहे. तसेच सध्या तयार असलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.

11. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं देखील यावेळी आश्वासन देण्यात आलं आहे. परंतु, प्रकरणनिहाय गुन्हे देखील आढावा बैठकीत तपासण्यात येणार आहेत.

12. मराठा आंदोलनात मृत पवालेल्या आंदोलकांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यामध्ये कागदपत्राची पुर्तता करून निर्णय घेण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! खासदार संभाजीराजेंचं उपोषण मागे, मराठा समाजाच्या मागण्या मान्य

युक्रेनी सैन्याची भारतीयांना मारहाण?, राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चिंता वाढली

 रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?, बेलारूसच्या बैठकीवर जगाचं लक्ष लागलं

 “नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती”

 रशियामुळे पाकिस्तानची गोची; जो बायडन यांच्या इशाऱ्याने इम्रान खान यांचं टेन्शन वाढलं