झेडपीपोठोपाठ राज्यातील महापालिका पोटनिवडणुकीतही भाजपला झटका

मुंबई | जिल्हा परिषद निवडणुकीपाठोपाठ राज्यातील विविध महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव महापालिकेतील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. तर नागपूर आणि पनवेलच्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपचा विजय झाला आहे.

मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 141 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे 4427 मतं मिळवून विजयी झाले. प्रभाग क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत प्रवेश करत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता आणि शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर इथे पोटनिवडणूक झाली.

मालेगाव महापालिका पोटनिवडणुकीत महाआघाडीचा विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 12 ड मधून जनता दल-महागठबंधन आघाडीचे मुस्तकीन डिग्नेटिक 7992 मतांनी विजयी झाले आहेत. जनता दलाचे शहर अध्यक्ष बुलंद इकबाल निहाल अहमद यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. मुस्तकीन हे जनता दलाच्या नगरसेविका शान निहाल अहमद यांचे पती आहेत.

नाशिक महापालिका पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. सातपूर प्रभाग 26 अ मधून महाविकास आघाडीचे मधुकर जाधव (शिवसेना) विजयी झाले आहेत. तर मनसेचे दिलीप दातीर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

महत्वाच्या बातम्या-