अमित शहांच्या बँकेत बाद झालेल्या नोटांचा सर्वाधिक भरणा

अहमदाबाद : भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटांबदीच्या काळात गुजरातमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटांपैकी सर्वाधिक जुन्या नोटांचा भरणा झाल्याचं समोर आलंय. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत एक दोन नव्हे तर तब्बल 745.59 कोटी रुपये जमा झाले आहेत. 

नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पैसा जमा होणारी अमित शहांची बँक एकमेव बँक नाही. भाजपचे गुजरातमधील आणखी एक मोठे नेते आणि गुजरात सरकारमध्ये सध्या कॅबिनेट मंत्री असलेल्या जयेश रदडिया यांच्या बँकेतही मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटांचा भरणा झाला आहे. रदडिया संचालक असलेल्या राजकोट जिल्हा सहकारी बँकेत नोटाबंदीच्या काळात 693.19 कोटी रुपये जमा झालेत. 

नोटाबंदीच्या काळात कोणत्या बँकेत किती जुन्या नोटांचा भरणा झाला याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी नाबार्डकडून माहिती मागवली होती. त्या माहितीतून याबाबतचा उलगडा झाला आहे.

महाराष्ट्रात राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सर्वाधिक नोटांचा भरणा झाला आहे. या बँकेत 1128 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.