सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी होणार की नाही?; अमित शहा म्हणाले…

मुंबई – अभिनेता सुशांत सिंहने 14 जूनला मुंबईतील वांद्रा येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत त्याने आत्महत्या केली. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली.

बिहारचे मााजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांनी सुशांतची आत्महत्येबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.  सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे, असं पप्पु यादव यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांच्या हत्येची CBI चौकशी करावी अशी विनंती त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. त्यांच्या या विनंतीचा स्वीकार करत अमित शहा यांनी त्यांना पत्र पाठवलं आहे.

अमित शहा यांनी पप्पू यादव यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर दिलं आहे. पप्पू यादव आपण पाठवलेलं पत्र 16 जून 2020 रोजी मिळालं. आपण अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्याची विनंती केली आहे. तुमच्या पत्राचा विषय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे ते पत्र संबंधित मंत्रायलाकडे पाठवण्यात येत आहे, असं उत्तर अमित शहा यांनी पत्रातून दिलं आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत सुशांतचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि काही बॉलिवूड कलाकरांचे जबाब नोंदवले आहेत.