लॉकडाऊनवरुन राजकीय मतभेद; जिल्हाध्यक्षांचा तटकरेंवर नाव न घेता गंभीर आरोप

रायगड – रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस #कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे 15 जुलै ते 24 जुलै या कालावधीसाठी रायगड लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली होती. त्यांच्या या निर्णयावरुन कारखानदारांना राजकीय पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार माणिकराव जगताप यांनी तटकरे बापलेकीवर नाव न घेता केला आहे.

कारखाने सुरु करुन नागरिक, छोटे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना वेठिस धरणार असाल, तर माझा व्यक्तिगत विरोध आहे, अशी भूमिका माणिकराव जगताप यांनी घेतली आहे.

कुठलाही कारखानदार कारखाना बंद करत नाही. त्यांना राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असते. त्यामुळे सुदर्शनमध्ये 100 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्याचा परिणाम रोह्यातील नागरिक आणि गरीब जनतेला भोगावा लागतोय, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि अदिती तटकरे यांचे नाव न घेता माणिकराव जगताप यांनी केला.

लॉकडाऊन या विषयावर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने विचार करण्याची गरज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन करुनही लोक बाहेर निघतात, हायवे बंद करतात, ज्याच्या मनाला वाटेल, तसा जो-तो वागतो. करायचे असेल तर सगळे कारखाने बंद करुन 100% रायगड जिल्हा लॉकडाऊन करा, अशी मागणी माणिकराव जगताप यांनी केली आहे

कोरोनाच्या आजाराला लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. गेले सहा महिने जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात, तशी जनता वागते. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, अनेक लोकांचे रोजगार गेले, हातावर पोट असणारी रोजीरोटी बंद पडली, असं जगताप म्हणाले.