“तुम्हीच सांगा… कट्टर हिंदू कोण??? अमोल मिटकरी की आदित्य ठाकरे”

वाशी |  अनेक सभा संमेलनं गाजवून अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मनगटावर घड्याळ बांधून पवारांची साथ देण्याचं ठरवलं आहे. आज वाशीच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना अमोल मिटकरी यांनी धडधडा हनुमान चालिसा म्हटली आणि मी जशी आत्ता हनुमान चालिसा म्हटली तशी शिवसेनेच्या युवराजांनी म्हणावी. येईल काय त्यांना म्हणायला?? मग कट्टर हिंदू कोण…अमोल मिटकरी की आदित्य ठाकरे?? असा सवाल करत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

हिंदू- मुस्लिमांच्या नावावर शिवसेनेने आपल्या राजकारणाची पोळी भाजली. परंतू शरद पवारांनी कायम या महाराष्ट्रात समता कशी टिकेल आणि सर्व धर्मांमध्ये संवाद कसा राहिल हेच पाहिलं. येणाऱ्या काळात आपल्याला जातीयवादी सरकार पाडून शिवस्वराज्य आणायचंय म्हणून राष्ट्रवादीला साथ द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

राष्ट्रवादीच्या सभा गाजवणाऱ्या नेत्यांमध्ये आता आणखी एका सभा मारणाऱ्या कार्यकर्त्याच्या रूपात मिटकरींची भर पडली, असं म्हणावं लागेल. शिवस्वराज्य यात्रेत खासदार अमोल कोल्हेंचं भाषण ऐकायला जशी लोक उत्सुक आहेत तशी ती मिटकरींचं भाषण ऐकायला देखील उत्सुक असल्याचं पहायला मिळतंय.

महत्वाच्या बातम्या-