आव्हाडांनी मागणी अन् उद्धव ठाकरेंनी लगोलग घेतली दखल!

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या काळात आरेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तत्कालिन सरकारने रातोरात आरेमधल्या झाडांची कत्तल केली होती. यालाच पर्यावरण प्रेमींनी जोरदार विरोध दर्शवला होता. त्यावेळी सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र नव्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

आज सकाळीच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरेच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंंत्र्यांकडे केली होती. आरेच्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून मागच्या सरकारने ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले होते व तुरूंगात डांबले होते त्या सगळ्यांचे गुन्हे महाराष्ट्र विकास आघाडी च्या सरकारने त्वरित मागे घ्यावेत, असं ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी दखल घेत आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा केली.

आरेच्या आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाड यांनीदेखील सहभाग नोंदवला होता. ज्याप्रमाणे तुम्ही एका एका झाडाची कत्तल केली त्याचप्रमाणे निवडणुकीत तुमचा एक-एक आमदार पडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी त्यावेळी केली होती.

दरम्यान, आज सकाळी मी मागणी केली आणि माझ्या सरकारनी तातडीने निर्णय घेतला.. , असं ट्वीट करत सरकारचं त्यांनी अभिनंदन केलं आहे.

 

 महत्त्वाच्या बातम्या-