…त्यानंतर राऊतांनी अग्रलेख लिहावा, सामनाचा आताचा अर्धवट अग्रलेख; थोरातांची टीका

मुंबई |  आजच्या सामना संपादकीयमधून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती. ही टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आजचा सामनाचा अग्रलेख हा अर्धवट असून त्यातील माहिती ऐकीव स्वरूपाची आहे, अशा शब्दात थोरात यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमची भूमिका मांडल्यानंतर सामनाला पूर्ण माहितीच्या आधारे अग्रलेख लिहावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने सरकारने निर्णय घ्यावेत. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर काही मागण्या मांडायच्या आहेत. आम्ही आमची भूमिका मांडल्यावर मुख्यमंत्रीही समाधानी होतील. जनतेच्या आणि आमच्या व्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यानंतर सामनाला वस्तुस्थिती कळेल, मग त्यानंतर राऊतांनी अग्रलेख लिहावा, असं थोरात म्हणाले आहेत.

दुसरीकडे सकाळी अग्रलेख लिहून काँग्रेसवर टीका करणाऱ्या राऊतांनी मात्र थोड्या वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक पाऊल मागे घेतलं आहे. सरकारमधल्या तिन्ही पक्षांचा अगदी व्यवस्थित समन्वय आहे. तिन्ही पक्षांतल्या नेत्यांचं मुख्यमंत्री अगदी नीटपणे ऐकून घेतात आणि इथून पुढेही घेतील. सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काँग्रेसची जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते, अशा शब्दात राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असं राऊत म्हणाले होते.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-सरकारनं सांगितलं कोरोनाची ‘ही’ दोन लक्षणं दिसली; तर टेस्ट करुनच घ्या!

-सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट होतेय व्हायरल