विधानसभेसाठी भाजपचं ‘बारामती मिशन’ ठरलं; ही असणार रणनिती!

पुणे : आगामी विधानसभेमध्ये शरद पवारांचा बालेकिल्ला असणारी बारामती काबीज करण्यासाठी भाजपने नवीन रणनिती आखली आहे. संघाच्या मदतीने बारामती जिंकण्याचा भाजपचा डाव आहे. मंगळवारी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे काही स्थानिक नेते आणि संघाचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये बारामतीत कशा पद्धतीने यंत्रणा तयार करायची आणि उमेदवार कोण असणार यावर चर्चा झाली.

विधानसभेत बारामती जिंकायची असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यावी लागेल, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. यासाठी पुण्यात संघाच्या मोतीबागेतील कार्यालयात बैठका होत आहेत.

बारामती जिंकली नाही तरी पवार काका-पुतण्यांची कोंडी करणे हाच खरा भाजपचा मुख्य उद्देश आहे. तो उद्देश लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्याचे पाहायला मिळालं होतं. तशीच रणनिती विधानसभा निवडणुकीतही संघाच्या मदतीने भाजप आखत असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता. लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकला होता. त्यावेळीही पवार काका-पुतण्याची भाजपने जोरदार कोंडी केली होती.

दरम्यान, जर पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली तर मी बारामती जिंकून दाखवेन, असं गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीवेळी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-