“केंद्र सरकारनं रेल्वे दिल्या तरी ठाकरे सरकारनं रिकाम्या सोडायला हव्या होत्या”

मुंबई | कोरोना या भयंकर महामारीशी गेल्या दीड वर्षापासून सर्वजण लढत आहेत. कोरोनाच्या काळात देशात केंद्र सरकारनं विविध निर्बंधांच्या माध्यमातून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला पहायला मिळाला आहे.

कोरोनाच्या सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनूसार केंद्र सरकारनं देशभरात लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशात बराच गोंधळ झाला होता. परिणामी या गोंधळानंतर केंद्र सरकारवर टीकाही झाली होती.

सध्या देशाच्या अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लाॅकडाऊनमधील निर्णयावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. परिणामी राजकारण पेटलं आहे.

महाराष्ट्रात रोजगार करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहारचे नागरिक कामासाठी येतात. त्यांना लाॅकडाऊनची घोषणा होताच त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ठाकरे सरकारनं मदत केल्यावरून राजकारण पेटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यावर राज्यातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वक्तव्यांचं समर्थन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मैदानात उतरले आहेत.

महाविकास आघाडीतील नेते राज्याची दिशाभूल करत आहेत. मोदीजी काय म्हणाले आहेत हे लोकांना नीट कळलं आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. कोरोना काळात राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकली, असं मोदींना म्हणायचं होतं असंही पाटील म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांचं समर्थन करताना पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारनं कोरोना काळात काय काम केलं याची श्वेतपत्रिका काढा, असं पाटील म्हणाले आहेत.

केंद्र सरकारनं रेल्वे सोडली तरी ठाकरे सरकारची जबाबदारी होती की त्या रेल्वे रिकाम्या जाऊ द्याव्या, असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर आता काॅंग्रेसनं राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, ज्या डाॅक्टरांनी हौतात्म्य पत्करलं…”

 पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक, म्हणाले “शरदराव त्यावेळी जर…”

“राहुल गांधींनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं”

“महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही”

“मोदींनी पंतप्रधानपदी बसवणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान केलाय”