“भाजप म्हणजे मोठं घर पोकळ वासा; मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावांचीच ‘ही’ अवस्था”

मुंबई | सध्या महाराष्ट्र दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडं सांगली-कोल्हापूर भागात महापुरामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालंय. तर दुसरीकडं राज्यात भीषण दुष्काळ आहे. हंडाभर पाण्यासाठी कित्येक किलोमीटर लांब पायपीट करावी लागत आहे. दुष्काळाचा हाच मुद्दा अधोरेखित करत काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे.

भाजप मोठं घर पोकळ वासा या म्हणीप्रमाणे प्रमाणे वागतं आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या जव्हार तालुक्यातील पाथर्डी आणि रामकुंड गावात हंडाभर पाण्यासाठी तासनतास वाट पहावी लागतेय. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचीच ही अशी अवस्था असेल तर राज्यातली परिस्थिती काय असेल?, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

राज्यभर सर्वसामान्य लोक भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतंय, त्यामुळे सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यायची गरज असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

मुख्य़मंत्र्यांनी पाथर्डी आणि रामकुंड या गावांना दत्तक घेत त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी घेतली मात्र त्याच गावांची आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. तर मग महाराष्ट्राची अवस्था काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी!, असं म्हणत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, आता दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेसने केलेल्या या टीकेला भाजपकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलेलं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-