महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे -देवेंद्र फडणवीस

मुंबई | अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी सिंधुताईंनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. सिंधुताईंच्या निधनानंतर देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुताईंच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे. सिंधुताईंच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्व हरपले, अशी शोकसंवेदना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र एका जेष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने मला अतिशय वेदना होत आहेत, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या व्यक्तीमत्वातील कायम स्मरणात रहावे असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशिर्वाद देणे. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे, अशा शोकसंवेदना फडणवीसांनी व्यक्त केल्या.

मुळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्या गेलेल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना त्या अनेकदा भेटायला येत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचं समाधान आहे. पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या हे अधिक लक्षात आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान,सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

विमान प्रवाशांसाठी निर्बंध अधिक कठोर, वाचा सुधारीत नियमावली

उपेक्षितांसाठी सिंधुताईंचं काम खूप मोठं, त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं- नरेंद्र मोदी

‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला गंभीर इशारा

हजारोंची माय सिंधूताईंचा असा होता खडतर जीवनप्रवास!

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! राज्याची आकडेवारी 18 हजाराच्या पार