राष्ट्रवादीची साथ सोडून दिलीप सोपल अडकले शिवबंधनात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत जाणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.

दिलीप सोपल यांनी निवासस्थानी एक पत्रकार परिषदेत घेऊन राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी मतदार संघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतल्याचं सोपल यांनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीकडे आमदार दिलीप सोपल यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे सोपल पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती.

राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातच हादरे बसू लागले आहेत. मागील काही दिवसात राष्ट्रवादीचे वजनदार नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यात आमदार दिलीप सोपल यांचीही भर पडली आहे.