एकनाथ खडसे यांच्यासह ‘या’ 72 नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश!

जळगाव | अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कित्येक दशके भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपचा सदस्यत्वाचा राजीनामा देत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील आज हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. खडसे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबार तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील या नेत्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज झेंडा हाती घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते या सोहळ्यास उपस्थित होते.

तसेच कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी इत्यादी अनेक राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते.

दरम्यान, काल पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी अनेक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.

भाजप पक्षांतर्गत माझ्या विरोधात चाललेल्या कट कारस्थानाचे पुरावे मी पक्षाला दिले. मात्र, तरीदेखील पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता पक्षाला माझी गरज नाही हे माझ्या लक्षात आलं आहे, असं खडसे यांनी म्हटलं होतं.

तसेच गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या पक्षांतराविषयी चर्चा चालू आहेत. मात्र, तरी देखील कोणीही माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ चंद्रकांत पाटील हे मला फोन करून यातून मार्ग काढू असं म्हटले. पण अखेरपर्यंत त्यांनी मार्ग काढला नाही, असाही आरोप खडसे यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-