“गेल्या पाच वर्षात राज्यात 60 लाख व्यक्तींना रोजगार मिळाला”

मुंबई | राज्यात सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या 10 लाख 27 हजार उद्योगांमध्ये एक लाख 65 हजार 62 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यात 60 लाखांहून अधिक व्यक्तींना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. देशातील एकूण रोजगारांपैकी 25 टक्के रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

राज्यातील सर्व विभागांमध्ये नवीन उद्योगांमध्ये गुंतवणुकीत वाढ झाली आहे. मराठवाडा विभागात एक लाख आठ हजार 674 उद्योग सुरू झाले. त्यामध्ये 17 हजार 663 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून पाच लाख 80 हजार 507 रोजगार निर्माण झाला आहे, असं देसाई म्हणाले आहेत.

विदर्भात एक लाख 94 हजार 420 उद्योग सुरू करण्यात आले असून त्यामध्ये 18 हजार 236 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यात सहा लाख 37 हजार 409 इतकी रोजगार निर्मिती झाली असल्याचे देसाई यांनी नमूद केले. 

दरम्यान, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र या दोन महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाली त्यामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करारापैकी अनेक उद्योग कार्यान्वित झाले आहेत, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.