आरोग्य विभागात खळबळ; ‘या’ हॉस्पिटलमधील 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण

पाटणा | भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे (Corona Cases in India) रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकारामुळे दररोज रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील NMCH मध्ये रविवारी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

रुग्णालयातील 194 डॉक्टरांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली होती. यांपैकी 84 डॉक्टरांना लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टरांना लागण झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता 200 डॉक्टरांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.

जेणेकरून कुणाला कुणाला संसर्ग झाला हे समजू शकेल. तसेच ज्या 84 डॉक्टरांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे त्यांत, अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, ज्युनिअर डॉक्टर, सिनिअर डॉक्टर्सचा समावेश आहे.

दरम्यान, 1 जानेवारी म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात एकाच दिवसात कोरोनाची 22,775 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, ही 6 ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक प्रकरणं आहेत.

आता देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे. यासोबतच कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटची (Omicron Variant) 161 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर ओमिक्रॉनबाधित एकूण रुग्णांची संख्या 1431 वर पोहोचली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमिक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास सुरुवात केली आहे.

इतकंच नाही तर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शिगेला पोहोचेल आणि त्या काळात दररोज रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचू शकेल (Third Wave of Coronavirus), अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मुख्यमंत्री-राज्यपाल पुन्हा आमने सामने; राज्यपालांकडून चौकशीचे आदेश

सुप्रिया सुळेंनी पटकावला नंबर वनचा किताब, लोकसभेत दमदार कामगिरी

भाजप आमदार म्हणतात, “मी अजितदादांचा फॅन, मी त्यांचं…”

“…त्यावेळी अनिल देशमुखांनी मदत केली”, नितीन गडकरींनी मानले आभार

काळजी घ्या! गेल्या 24 तासातील धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर