“गळ्याची आण… फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याने सगळ्यात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल”

मुंबई |   माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला केंद्रिय मंत्री म्हणून जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहेत. आज याच चर्चेला मूर्त स्वरूप दिलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि ते ही फडणवीसांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्याच कार्यक्रमात…! 

देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पडला. या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच महाविकास आघाडीतले मंत्री आणि आमदार तसंच भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणात फडणवीसांच्या ‘दिल्लीला जाण्यावर’ सगळ्यात जास्त आनंद सुधीर मुनगंटीवारांना होईल, असं गमतीशीर भाष्य केलं. गळ्याची आण खोटं बोलत नाही… असं म्हणत त्यांनी मुनगंटीवारांना चिमटाही काढला.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांची तारीफ करत एक किस्साही सांगितला. अजित पवार म्हणाले-

“राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत होतो. त्यावेळी विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात जोरदार गोंधळ घालत होते. मात्र यामध्ये भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस अगदी शांतपणे अर्थसंकल्प ऐकत होते. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन जोरदार घोषणा देत होते. मात्र फडणवीस कानाला एअरफोन लावून आणि बाकड्यावर डोकं ठेऊन अगदी शांतपणे अर्थसंकल्प समजून घेत होते. तसंच टिपणं देखील काढत होते. मला असं वाटायचं की फडणवीसांनी उठावं आणि गोंधळ घालणाऱ्यांना समजून सांगावं की जरा अर्थसंकल्प ऐका म्हणून… पण मुनगंटीवार आणि महाजनांना काय माहिती की या बाबाच्या हाताखालीच आपल्याला पुढे मंत्री म्हणून काम करायचंय….” असं अजित पवार म्हणताच सभागृहात खसखस पिकली.

“देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पासारख्या विषयावर पुस्तक लिहिल्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरोखर यावेळी पहिल्यांदाच निवडून आलेल्या सगळ्या युवा सदस्यांनी हे पुस्तक वाचावं आणि नेमकं अर्थसंकल्प म्हणजे काय? त्यातल्या तरतुदी कशा असतात हे समजून घ्याव्यात”, असं ते म्हणाले.

सगळ्या सदस्यांच्या भावी आयुष्याकरिता आणि राजकारणात काम करत असताना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हा विश्वास व्यक्त करतो आणि पुस्तक सोप्या भाषेत असल्याने अभिनंदन देखील सोप्या भाषेत करतो, असं म्हणत अजित पवारांनी हास्याचे फवारे उडवणाऱ्या आपल्या भाषणाचा शेवट केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना राजकारण सोडण्याचा सल्ला; म्हणाले…

-कोरोनाचा आयपीएलवर परिणाम??; बीसीसीआयने दिली पहिल्यांदाच माहिती

-ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल; फडणवीसांची टीका

-कोरोना व्हायरस जगाला ‘या’ 4 गोष्टी शिकवणार; आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

-कोरोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा; महंत परमहंस यांचा अजब दावा