महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या लेकीची कमाल; खेलो इंडिया गेम्समधून खेचून आणली पदकं!

गुवाहटी | शेतकऱ्यांची पोरं असली तरी आपल्याकडे असलेल्या नैसर्गिक गुणवत्तेच्या आधारे पदकांच्या यादीत स्थान मिळविता येते, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या रिंकी पावरा आणि पूनम सोनुने यांनी खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात मैदानी स्पर्धेत दाखवून दिला.

नंदुरबार जिल्ह्यातील खर्डी या आदिवासी गावात छोटीशी शेती असलेले धन्या पावरा यांची कन्या रिंकी हिने येथील 17 वर्षाखालील मुलींच्या गटात 3 हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक पटकाविलं. रिंकीने 10 मिनिटे 5.33 सेकंदात ही शर्यत पार केली. रिंकीने 2018 मध्ये मॅरेथॉन शर्यतीत भाग घेतला होता.

रिंकीने केलेली कौतुकास्पद कामगिरी पाहून नाशिकमधील ख्यातनाम प्रशिक्षक विजेंदरसिंग यांनी तिला आपल्या अकादमीत प्रशिक्षणाची संधी दिली. रिंकीने पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 3 हजार मीटर्स शर्यतीत रौप्यपदक पटकाविलं होतं.

पूनम ही मूळची बुलढाणा येथील असून तिचे वडील शेती करतात. तिने गतवर्षी पुण्यातील खेलो इंडिया स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते. मंगलोर येथे नुकत्याच झालेल्या आंतर विद्याापीठ स्पर्धेत तिने 10 हजार मीटर्समध्ये सुवर्णपदक मिळविले होते. ही स्पर्धा संपवून येथे येताना ती तापाने आजारी पडली. तरीही तिने येथे भाग घेतला. तिला येथे 5 हजार मीटर्सचे अंतर पार करण्यास 17 मिनिटे 21.6 सेकंद वेळ लागला.

महत्वाच्या बातम्या-