“मला खूप आनंद झालाय, पण हे विरोधी पक्षांचं यश नाही”

मुंबई | गेल्या एक वर्षापासून संसदेच्या तोंडावर आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. तब्बल 700 हून अधिक आंदोलनकारी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कृषी कायदे मागं घेण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे.

देशभरातून विविध राज्यातील शेतकरी आंदोलन करत होते. तीन कृषी कायदे करत मोदी सरकारनं देशाच्या शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याचं आश्वासन दिलं होतं. हे कृषी कायदे देशाच्या संसदेत पारित झाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता.

तब्बल एका वर्षानंतरच्या मोठ्या संघर्षानंतर मोदी यांनी हा निर्णय घोषित केल्यानं निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं मोदींनी हे पाऊल उचलल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मोदींचा हा निर्णय देशातील शेतकरी वर्गाला सुखावणारा असल्याचं हजारे म्हणाले आहेत.

केंद्रीय कृषी कायदे मागं घेण्याची नरेंद्र मोदींनी केलेली घोषणा ऐकून मला आनंद झाल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत. अण्णा हजारे यांनी यावेळी मोदींची मुक्त कंठानं स्तुती केली आहे.

तीन कृषी कायदे माघारी केल्यानंतर मला समाधान झालं आहे. हे यश शेतकरी आंदोलनाचं आहे विरोधी पक्षांचं नाही, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

दिल्लीत आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांना बोलावण्यासाठी आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळ अण्णा हजारे यांना भेटलं होतं पण अण्णा हजारे यांनी काही कारणास्तव नकार दिला होता आणि आता कायदे रद्द झाल्यानंतर अण्णा यांनी आनंद व्यक्त केल्यानंतर अण्णांना ट्रोल करण्यात येत आहे.

आपल्या देशात शेतकरी प्रचंड संकटात आहे. त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे, असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत.

या तीनही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात आलं नाही. केंद्रानं केलेल्या कायद्यात शेतकऱ्यांबाबत योग्य धोरण आखण्यात आलं नव्हतं, अशी टीका अण्णांनी केली आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्यावर या आंदोलनात सहभागी झाले नाहीत म्हणून अनेक संघटनांनी जोरदार टीका केली आहे. देशभरातील सर्वस्तरातून नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं गेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘उशिरा का होईना शहाणपण आलं, निवडणुकीत…’; शरद पवारांचा मोदींना टोला

 “कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद”

  थंडीत ऊन-पावसाचा खेळ; येत्या 3 दिवस ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस

  ‘मोदींनी आता ‘ही’ मागणीही मान्य करावी’; मोदींच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

  ‘…तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही’; राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया