“2024 आधी आपलं सरकार आलं तर ‘बोनस’ नाहीतर…”

मुंबई | 2019 च्या निवडणूकीत एक वेगळीच चुरस निर्माण झाली होती. शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणूका लढवल्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईल’चा नारा दिला होता. सेना भाजपला बहुमत मिळून देखील त्यांना सत्ता हाती घेता आली नाही.

राज्यात नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. पण त्यानंतर देखील देवेंद्र फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईल’चा नारा चांगलाच गाजला होता. आता याच नाऱ्यावरून शिवसेनेने अनेकदा फडणवीसांना टोला लगावला आहे.

अशातच आता भाजप कार्यालयात आज भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली, त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेविषयी भाष्य केलं आहे.

राज्यातलं सध्याचं सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत आहे. जनतेच्या कल्याणासाठी आपल्याला मैदानात उतरावच लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

2024 आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू. तसं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊच, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

पण येणाऱ्या काळात भाजपाचं स्वत:च्या भरवशाचं स्वत:चं सरकार आपण आणून दाखवू, अशा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जनता सर्व पाहत आहे, हे सरकार तोंडावर पडलंय. येत्या काळात आपल्या युद्धाला सामोरं जावं लागणार आहे. जनतेच्या कल्याणासाठी आपल्याला मैदानात उतरावंच लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

पहिल्यांदा आपल्याला स्थानिक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता येत्या स्थानिक निवडणुकांसाठी भाजप तयारीला लागल्याचं दिसून येतंय.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं असं आज राज्य सरकार सांगतं आहे, पण राज्याला लसी कुणी दिल्या?, असा सवाल देखील फडणवीसांनी विचारला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘मला कळत नाही लोकं दारू का पितात?’; मुख्यमंत्र्यांना पडला प्रश्न

‘शिवाज्ञा! ये रे माझ्या गड्या…’; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची बाबासाहेब पुरंदरेंना अनोखी आदरांजली

भर आंदोलनात रामदास आठवलेंनी रचल्या कवितेच्या ओळी, म्हणाले…

‘कपडे काढले तरी निर्लज्जांवर परिणाम होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”