सुशांत सिंह प्रकरणात ‘हा’ मराठी दिग्दर्शक एनसीबीच्या जाळ्यात

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक मोठी मोठी नावे समोर आली होती. समोर आलेल्या नावांची एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली होती. अशातच आता ड्रग्ज प्रकरणात मराठी दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.

मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश पवारला जेलबंद करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. अनेकवेळा नोटीस पाठवून देखील ऋषिकेश चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्यानंतर एनसीबी पथक ऋषिकेश पवार याच्या घरी गेलं होतं, त्यावेळी तो घरी नसल्यामुळे एनसीबीने त्याला फरार म्हणून घोषीत केलं होतं. एनसीबीनं त्याच्या घरी धाड टाकत महत्वाची माहिती मिळाली होती.

सुशांत सिंहचा जवळचा मित्र व सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेला ऋषिकेश पवार अनेक महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होता. सुशांतला तसेच बॉलिवूडमध्ये अनेकांना तो ड्रग्ज पुरवत होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

मंगळवारी ऋषिकेश पवारला ताब्यात घेऊन बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात नेण्यात आलं. एनसीबीनं त्याला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी त्याची चौकशी केली जाणार आहे. दीपेश सावंत याच्या चौकशीतदेखील याच्या नावाचा उल्लेख झाल्याचं समजतंय.