Budget 2022 | यंदाच्या अर्थसंकल्पात ‘या’ गोष्टींवर सगळ्यांचं लक्ष, जाणून घ्या

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प ( Budget 2022 ) सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात सर्वांचं लक्ष अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणा-या केंद्रीय अर्थसंकल्प-2022 कडे असेल.

अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम आहे. तसेच अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोना महासाथीचा मोठा फटका या क्षेत्राला बसला होता.

सरकारने या उद्योगांसाठी आधीच एक योजना जाहीर केली होती, ज्यामध्ये क्रेडिट हमी योजना सर्वात महत्त्वाची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड (COVID 19) मुळे उद्भवलेली आव्हाने आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकारणातील गरजा यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न असेल. मात्र अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात शुल्कात कपात होण्याची शक्यता आहे. भांडवली खर्च (Capital Expenditure)वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अधिक खर्च करता येईल.

FICCI आणि इतर उद्योग संघटनांनी सरकारला महसुली तुटीवर कमी आणि गुंतवणुकीवर अधिक भर द्यावा असं आवाहन केलं आहे. वाहने आणि इतर वस्तूंमध्ये वापरल्या जाणार्‍या सेमीकंडक्टर चिप्सच्या आयात आणि उत्पादनाबाबत काही सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्य लोक तसंच उद्योग आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या काही अपेक्षा आणि मागण्या असतात. सरकारने प्राप्तिकराची मूळ सूट मर्यादा अडीच लाखांवरून 3 लाखांपर्यंत वाढवावी, अशीही मागणी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेगवेगळ्या गुंतवणुकीवर दीर्घकालीन भांडवली नफा कर भरू नये, अशीही लोकांची मागणी आहे. सरकारने हा कर रद्द करावा, अशी गुंतवणूकदारांची इच्छा आहे. मात्र, सरकारने ते रद्द करण्यास नकार दिला आहे. मात्र भविष्यात यात काही बदल होणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

राज्यातील निर्बंधांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता… 

Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थव्यवस्थेला गती मिळणार? 

“राहुल गांधींचं पाकिट कुणी मारलं?”; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ 

 जगभरात NeoCoV व्हायरसची दहशत; तज्ज्ञांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती

 ओमिक्रॉनमधून नीट झाल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका