त्याला वाटतं तो खूप मोठा क्रिकेटर आहे; अटकेच्या वॉरंटनंतर शमीच्या पत्नीची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर पत्नी हसीन जहाँने न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. हसीन जहाँने गतवर्षी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने शमीविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने शमीला आत्मसमर्पण करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.

मी न्यायव्यवस्थेची आभारी आहे. मी जवळपास गेल्या एक वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी झटत आहे. शमीला आपण खूप प्रभावशाली तसंच खूप मोठे क्रिकेटर आहोत असं वाटतं, अशी प्रतिक्रिया हसीन जहाँ यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे.

जर मी पश्चिम बंगालची नसते, जर ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी येथे सुरक्षित राहू शकले नसते. उत्तर प्रदेशातील अमरोहा पोलीस सतत मला आणि माझ्या मुलीला त्रास देत होते. पण सुदैवाने त्यांना यश मिळालं नाही, असंही हसीन जहाँ यांनी म्हटलं आहे.

मोहम्मद शमीसोबत त्याचा भाऊ हसीद अहमद याच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयाने आत्मसमर्पण करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असंही कोर्टाने म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-