बुरखाबंदी करणार असाल तर घुंगटबंदीही करा; जावेद अख्तर सरकारला आव्हान

भोपाळ : निवडणुकांनंतर देशात बुरखाबंदीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून बुरखाबंदीची मागणी करण्यात आली तेव्हापासून राजकारणात नवनवे वाद पेटू लागले. 

या मुद्द्यावरुन अनेक कलाकार, राजकारणीमंडळी आपली मतं व्यक्त करत आहेत. त्यामध्ये आता गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. जर देशात बुरखाबंदी करणार असाल तर राजस्थानमध्ये घुंगटबंदीही करा. असं आव्हान त्यांनी केलं आहे. ते भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 

-जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले? 

इराण हा देश कट्टर मुस्लीम देश आहे. पण तिथे महिला त्यांच्या चेहऱ्याचं प्रदर्शन करत नाहीत. जो कायदा श्रीलंकेत लागू करण्यात आला आहे तो आपण भारतात लागू करायचा असेल तर राजस्थानमधील शेवटचं मतदान होईपर्यंत सरकारला जाहीर करावं लागेल की, राजस्थानमध्ये कोणतीही महिला घुंगट नाही घेऊ शकत नाही. -जावेद अख्तर 

त्याबरोबर जावेद अख्तर यांनी बुरखाबंदीला विरोध करत असताना लोकांना आपण काय घालावे आणि काय नाही यांची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपल्या इच्छेनुसार आपण धर्माचे पालन करायला हवे, असं म्हणाले आहेत.

साध्वी आणि साधूंवर एवढं प्रभावित होऊ नका. तुम्ही विसरता आहात की, रावण जेव्हा सितेचं हरण करण्यासाठी आला होता तेव्हा तोही साधूच्याच वेशात आला होता. त्यामुळे महत्वाचं नाही की, कोणी साधूचं वेष घेतलं म्हणजे साधूचं असतील. -जावेद अख्तर 

जावेद अख्तर यांनी बुरखाबंदीला विरोध करताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका तर केलीच त्याचबरोबर त्यांनी भाजपलाही चांगलच धारेवर धरलं आहे.

-पत्रकार परिषदेत जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेमका काय सल्ला दिला

भाजपची अशी विचारधारा आहे की, तुम्ही त्यांना विरोध केला तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जात. प्रज्ञा ठाकूर यांच्या शापाने जर हेमंत करकरेंसारखे देशभक्त अधिकारी शहीद होत असतील तर त्यांनी या शापाचा वापर देशहीतासाठी करावा. माझा मोदींना सल्ला आहे की, त्यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शापाचा वापर हाफिज सईद आणि इतर दहशतवाद्यांविरोधात करावा. भाजपने प्रज्ञासिंह यांना उमेदवारी जाहीर करुन स्वत:चा पराभव स्विकारला आहे. -जावेद अख्तर 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक जावेद अख्तर यांनी केलं आहे. देशातील बुरखाबंदीचा मुद्दा हा काय निवडणूक होईपर्यंत शांत होणार नाही असंच दिसत.