आजचं बजेट एका वर्षाची दिशा देऊ शकत नाही तर दशकाची दिशा काय देणार?? जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई |   केंद्रातील नरेंद्र मोदी 2.0 सरकारने येत्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. भाजप नेत्यांनी हा दशकातील सर्वांत चांगला अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. तर विरोधी पक्षांनी हे बजेट अत्यंत निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाहीये. मोदींचं लक्ष गुजरात आणि अहमदाबाद आहे. म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काही ठोस दिलं गेलं नाहीये. मुंबईकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र आणि मुंबईचं महत्व कमी करणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. हे सरकार देशाला एका वर्षाची दिशा देऊ शकत नाही तर दशकाची दिशा काय देणार? असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करताना दशकातील हा सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर पाटील यांनी हे सरकार देशाला एका वर्षाची दिशा देऊ शकत नाही तर दशकाची दिशा काय देणार? असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला आहे.

जीएसटीबाबत सरकार पाठ थोपटून घेतंय. मात्र त्यामुळे राज्यांच झालेलं नुकसान कधी भरून देणार? महाराष्ट्राचे पैसेही मिळालेले नाही. अनेक कंपन्यांचे खासगीकरण करण्याची सरकारची मानसिकता आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीयेत. देशात स्वातंत्र्यानंतर तयार केलेली व्यवस्था मोडून काढायचं काम सुरू आहे, अशी टीका पाटील यांनी केंद्रावर केली आहे.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. अर्थसंकल्पातील इन्कमटॅक्स स्लॅब मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. याने लोकांना फायदा होईल असं वाटत नाही. अर्थव्यवस्थेला गती देण्यासारखं अर्थसंकल्पामध्ये काहीच नसल्याचं पाटील म्हणाले आहेत.

देशात आर्थिक मंदी असताना आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून देशवासीयांना मोठी अपेक्षा होती मात्र देशवासीयांची अपेक्षा केंद्र सरकारने पार धुळीस मिळवली. अर्थसंकल्पात कोणतीच ठोस तरतूद नाही. हा तर गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प आहे, अशा शेलक्या शब्दात पाटील यांनी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचा समाचार घेतला आहे.

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांच्या 3. 6 लाख कोटी रूपयांना झटका!

-मोठमोठे आकडे दाखवून दिशाभूल करण्याच्या प्रयत्न; अर्थसंकल्पावर जलीलांची टीका

-देशाच्या शेतीचं आकारमान केवढं??… तरतूद किती कमी करताय; राजू शेट्टी अर्थसंकल्पावर नाराज

-“LIC विकल्यानंतर तुम्ही काय विकणार आहात??… आता आपल्याला आपली LIC वाचवावी लागेल”

-मोहम्मद शमी सध्याच्या घडीचा जगातला सर्वोत्तम गोलंदाज; शोएब अख्तरची स्तुतीसुमनं