Uncategorized

तानाजी सावंत यांच्याविरोधात महिला राष्ट्रवादी आक्रमक; सावंतांच्या घरात सोडले खेकडे!

पुणे | खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटले, असा अजब तर्क लावणाऱ्या जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने सावंतांच्या घराबाहेर खेकडे फेकले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

तिवरे धरण फुटून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सावंत यांनी खेकड्यांमुळे धरण फुटलं असा अजब दावा केला. आता खेकड्यांनी धरण फोडलं म्हटल्यावर गुन्हा तरी कुणावर दाखल करायचा? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. यानंतर संपुर्ण महाराष्ट्रामधून सावंतांवर टीकेची झोड उठली होती.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर आणि त्यांची संपूर्ण टीम सावंत यांच्या कात्रजच्या घराबाहेर पोहचली आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर खेकडे फेकले.

राष्ट्रवादी युवकच्या वतीने देखील असेच आंदोलन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरच्या शाहूवाडी पोलिस स्थानकात खेकड्यांवर 302चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, खेकड्यांना पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन करून 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती.

IMPIMP